सातारा प्रतिनिधी | शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील खंडाळा तालुक्यातील एका गावात एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचाराची धक्कादायक रविवारी घटना घडली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी, की खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी व दोघे संशयित घराच्या टेरेसवर खेळत होते. रात्रीच्या सुमारास पीडित मुलगी झोपेतून उठून रडू लागली. त्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय असून, काल पीडितेला घराच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याची संशयितांनी कबुली दिली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नयना कामथे करीत आहेत.