पाटण प्रतिनिधी | बंदुकीचा छरा लागल्याने एक युवक जखमी झाल्याची घटना पाटण तालुक्यातील नावडी येथे घडली होती. जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसाद वामन जामदार (वय २४, रा. नावडी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नावडी गावात असलेल्या एका चौकात दि. २९ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण गप्पा मारत होते. त्यातील एक तरुण रात्री शेतात राखण करण्याच्या उद्देशाने घेऊन थांबला होता. यावेळी शेतात राखण करण्यास निघालेले तरुण चेष्टामस्करी करत होते. यावेळी धनाजी अनिल कोळी (वय २२) याने प्रसाद जामदारवर बंदूक रोखून चाप ओढला. त्यातून सुटलेला छरा प्रसादच्या छातीशेजारी लागला.
यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने युवकांनी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी जखमी प्रसादचा मृत्यू झाला. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक विजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी घटनास्थळी भेट दिली होती, तसेच संशयित धनाजी कोळीला अटक करण्यात आली आहे.