पाटण प्रतिनिधी | शासनाने राबवलेल्या शंभर दिवसीय कार्यक्रमामुळे पाटण तालुक्यातील लोकांना त्याचा चांगला लाभ होत आहे. तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडलातील लोकांच्या अडीअडचणी आणि समस्यांचा जागेवरच निपटारा व्हावा, यासाठी ‘शासन आपल्या दारी अभियान’ पाटण तालुक्यात यशस्वीपणे राबवले जात असून, त्याचा लोकांना चांगल्या प्रकारे फायदा तर होत आहेच. शिवाय त्यांचा वेळ आणि पैशांची बचत होत असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पाटण तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले तत्काळ देण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे थेट वारस नोंद या उपक्रमामुळे अनेक वर्षांच्या तालुक्यात रखडलेल्या वारसांच्या नोंदी होऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता मिळत आहे. ज्यांच्या वारस नोंदी झालेल्या नाहीत, अशा लोकांनी तत्काळ महसूल विभागाकडे अर्ज करून आपल्या वारस नोंदी करून घ्याव्यात.’ पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची ७/१२ विषयक कामे प्राधान्याने घेतली जात आहेत. यामध्ये वारसनोंदी, तुकडा नोंदी कमी करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, पाणंद व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सामाजिक अर्थ साह्य योजनेंतर्गत विधवा, वृद्ध, निराधार, दिव्यांग यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांचे जीवन उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले तत्काळ देण्यात येत आहेत.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विभागात हे अभियान यशस्वीपणे राबवले जात असून, प्रत्येक मंडलातील मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक ही योजना तळागळापर्यंत पोहोचवत असल्याने त्याचा जनतेला लाभ होत असल्याचे तहसीलदार गुरव यांनी यावेळी सांगितले.