सातारा प्रतिनिधी । गेल्या तीन आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बळीराजाला खरीप हंगामातील पेरणी सुद्धा पुरेशा प्रमाणात करता आलेली नाही. संततधारपणे पडलेल्या पावसामुळे मे महिन्यापासून पेरण्यासाठी लागणारा वाफसा मिळाला नसल्याने शेतकर्यांना शेतात पिकच घेता आलेले नाही. यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. साधारणतः खरीप हंगामात भुईमुग, सोयाबीन, मका, कडधान्य आणि घेवडा आदी पिके घेतली जातात. मात्र, ही पिके घेता आलेली नाही.
सातारा जिल्ह्यातील यंदाच्या वर्षीची खरीप पेरणीची आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यात 40% हेक्टर क्षेत्रात खरीप हंगाम पेरणी झाली आहे. तर मागील वर्षी जुलै महिन्यातील 87% जिल्ह्यात खरीप पेरणी झाली होती. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 47% पेरणी कमी झाली आहे. एकूणच सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी 3 लाख 96 हजार 392 हेक्टर क्षेत्रावर होणे अपेक्षित होते. मात्र; सलग पावसामुळे 1 लाख 58 हजार 595 हेक्टर वर पेरणी झाली आहे.
खरीप हंगाम पेरणीची आकडेवारी
सातारा तालुका : सातारा तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी पाहिल्यास या ठिकाणी सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 52 हजार 288 असून सध्या पेरणी क्षेत्र 10 हजार 185 एकर आहे.
जावली तालुका : जावली तालुक्यात देखील स्टेट पाऊस पडल्यामुळे येथील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पाऊस कमी शिवण्याची वाट पहावी लागली. या तालुक्यातील सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 18 हजार 914 असून 1 हजार 483 एकर क्षेत्रात पेरणी करण्यात आलेली आहे.
पाटण तालुका : सतत पाऊस असल्या कारणामुळे पाटण तालुक्यात या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. कारण सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 60 हजार 410 असून देखील फक्त 16 हजार 361 एकर क्षेत्रात शेतकऱ्यांकडून पेरणी झालेली आहे.
कराड तालुका : कराड तालुक्यात देखील पाऊस पडल्यामुळे या तालुक्यात एकूण पेरणी योग्य क्षेत्रापैकी निम्म्या हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र हे 58 हजार 629 इतके आहे. तर सध्या पेरणी क्षेत्र 31 हजार 178 एकर झालेली आहे.
कोरेगाव तालुका : कोरेगाव तालुक्यात देखील पावसाने चांगली हजेरी लावली. या तालुक्यात सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 39 हजार 776 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 9 हजार 453 एकर आहे.
खटाव तालुका : काहीसा दुष्काळी तालुका असलेल्या खटाव तालुक्यात सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 49 हजार 124 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 28 हजार 818 एकर झाली आहे.
माण तालुका : सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 40हजार 245 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 26 हजार 609 एकर झाली आहे.
फलटण तालुका : सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 32 हजार 453 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 15हजार 592 एकर झाली आहे..
खंडाळा तालुका : सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 19 हजार 714 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 8 हजार 901 एकर झाली आहे..
वाई तालुका : सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 20 हजार 373आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 8 हजार 194 एकर झाली आहे..
महाबळेश्वर तालुका : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 4 हजार 466 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 1हजार 820 एकर झाली आहे.