मळेवाडमध्ये जेरबंद केलेल्या बिबट्यावर साताऱ्यातील वन्यप्राणी केंद्रात उपचार सुरु

0
401
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आक्रमक झालेल्या बिबट्याने मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे एका बिबट्याने चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.या बिबट्याला पकडल्यानंतर मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले आहे. साताऱ्यातील वन्यप्राणी उपचार केंद्रात त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून बिबट्याच्या पायात फासके अडकल्याने मागील पायाला दुखापत झाली आहे. डॉ. निखिल बनकर यांनी बिबट्यावर उपचार केले असून उपचारानंतर बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्यानंतर बिबट्या देऊळवाडी येथील नदीलगतच्या शेडमध्ये दडी मारून बसला होता. हा बिबट्या बारा तासांपासून वनविभागाच्या नजरकैदेत होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या बिबट्याला उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वन परिमंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद केले होते.

आठ ते दहा वर्षे वयाचा बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो उपाशी असल्याने अस्वस्थ असल्याचे तसेच अंगावर काही जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बिबट्याला सातारा येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर डॉ. निखिल बनकर यांनी उपचार करून केले. उपचारानंतर बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.