शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून

0
3695
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | अज्ञात व्‍यक्‍तीने धारदार शस्‍त्राने गळा चिरून विवाहितेचा खून केल्‍याची घटना शिवथर (ता. सातारा) येथे सोमवारी दुपारच्‍या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

पूजा प्रथमेश जाधव (वय २५) असे खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे. घटनास्‍थळी दाखल झाले तसेच विवाहितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्‍हा रुग्‍णालयात नेण्‍यात आला असून, पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवथर- मालगाव मार्गावरील एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सातारा- मालगाव मार्गावरील रोमन वस्तीवर मोजकीच घरे आहेत. तेथे पूजा जाधव कुटुंबीयांसह राहात होती. घरात सासू आनंदीबाई, सासरे निवृत्ती जाधव, पती प्रथमेश जाधव व मुलगा यश जाधव असे सदस्‍य असतात, तर प्रथमेशचा दुसरा भाऊ सागर जाधव हा कामानिमित्त कुटुंबासमवेत पुणे येथे असतो.

सोमवारी घरातील सासू- सासरे हे कामानिमित्त शेतामध्ये गेले होते. पती प्रथमेश जाधव हा सातारा येथील आनंद ट्रेडर्समध्ये सकाळी साडेनऊ वाजताच कामाला गेला होता, तर मुलगा यश जाधव (वय सात) हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून, तोही शाळेत गेला होता. त्‍यामुळे राहत्या घरामध्ये पूजा जाधव ही एकटीच होती. सर्वांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू असतानाच दुपारच्या दरम्यान घरातील सर्व दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारी राहात असणारी वृद्ध महिला घरामध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर शेजाऱ्यांनी सासू- सासऱ्यांना बोलावून घेतले.

घरामध्ये झालेला प्रकार पाहून सासू- सासरे हतबल झाले. शेजाऱ्यांनी पती प्रथमेशला बोलावून घेतले. दरम्‍यान, घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नसून घटनास्थळी पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्‍यासह कर्मचारीही दाखल झाले. घटनास्थळी श्‍‍वान पथकालाही पाचारण करण्‍यात आले होते.