कराड प्रतिनिधी | बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही असे म्हणत मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालत तसेच तलवारीने वार करत खुनी हल्ला केल्याची घटना हजारमाची (ता. कराड) येथे घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी कराड शहर पोलिस ठाण्यात जखमी संजय दिनकर शिंदे (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित मुलगा आकाश शिंदे (24) याला ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हजारमाची गावच्या हद्दीत मळा वॉर्डमध्ये गावठी ढाब्याच्या पाठीमागे संजय शिंदे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संशयित आकाश शिंदे याने तुम्हाला बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही, असे म्हणून वडील संजय शिंदे यांच्याशी वाद घातला.
त्यानंतर चिडून आकाश याने डोक्यात दगड घालून वडिलांना जखमी केले. नंतर त्याने संजय यांच्या गळ्यावर तलवारीने वार केला. सुदैवाने संजय शिंदे तो चुकविल्याने हा वार गळ्याऐवजी त्यांच्या कानावर बसला. यात संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.