सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून पुढील चार दिवसात कोकणातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवसात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आला आहे.
४ जुलै रोजी राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान पाहायला मिळणार असून कोल्हापूरच्या घाटभागात आणि सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रमध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये येत्या चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर, सातारा व पुणे घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, सातारा शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले असून गुरुवारी सकाळी काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. पण, बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण तयार झालेले होते, तर सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र, पाऊस होत आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप आहे.