झाडे उपटण्यावरून हजारमाचीत झाली 2 कुटुंबांत मारामारी; तिघे जखमी तर 5 जणांविरुद्ध गुन्हा

0
1134
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | हल्ली कोणत्याही किरकोळ कारणावरून मारामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील उत्तर हजारामाची गावात घडली. या ठिकाणी किरकोळ कारणावरून 2 कुटुंबांत मारामारी झाली. त्यात 3 जण जखमी झाले असून, याप्रकरणी दोन्हीकडील एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दि. ३ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या मारामारीत घरावर दगडफेक करून घरासमोर लावलेल्या वाहनांचीही तोडफोडही करण्यात आली आहे.

याबाबत परस्परविरोधी फिर्यादही दाखल करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास रामचंद्र जाधव यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, महेश शिवाजी जाधव (रा. उत्तर हजारमाची, ता. कराड ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी चुलते शिवाजी जाधव यांना ‘दादा, देवदेव करायचा देवाजवळची झाडे कशाला उपटायची,’ असे विकास जाधव बोलले. त्यावेळी शिवाजी जाधव यांनी ‘माझ्या पोराने लावलेली झाडे मी उपटीन नाहीतर काही पण करीन, तू मला कोण विचारणार?,’ असे म्हणून प्रत्युत्तर दिले. त्यावेळी विकास जाधव याचा भाऊ विलास जाधव हादेखील तिथे आला. त्याचदरम्यान विकास जाधव याचा चुलतभाऊ महेश जाधव याने धारदार शस्त्राने विकास जाधव व विलास जाधव यांच्या पोटावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. त्यामध्ये ते दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस हवालदार काटवटे करीत आहेत.

तर महेश शिवाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, विकास रामचंद्र जाधव, विलास रामचंद्र जाधव, सुनील रामचंद्र जाधव व विशाल विलास जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वडील शिवाजी जाधव यांना चुलत भाऊ विकास जाधव शिव्या देऊन हाताने मारहाण करत होता. ते सोडवण्यासाठी महेश जाधव तेथे गेले असता विकास जाधव याने विटा तसेच विलास जाधव, सुनील जाधव यांनी कळकाच्या काठीने मारहाण केली. तर विशाल जाधव यांनी हाताने मारहाण करून महेश जाधव यांना जखमी केले. तसेच घरावर दगडफेक करून घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार शेख तपास करीत आहेत.