सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दोन तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील कराड आणि माण तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला असून याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत दोन्ही संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
धीरज हणमंत कांबळे आणि श्रीकांत यशवंत जगदाळे, अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मार्च 2024 ते 30 जून 2025 यादरम्यान 17 वर्षाच्या मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याच गावातील एका तरूणाने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. याची माहिती समजताच तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात देखील करण्यात आला. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून श्रीकांत यशवंत जगदाळे यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला उद्या शुक्रवार दि. ४ जुलै रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर दुसर्या घटनेमध्ये कराड परिसरातील एका लॉजवर नेऊन 17 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर एकाने 2022 पासून वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने तरुणाशी बोलणे बंद केल्यानंतर व्हॉट्सअपवर कॉल करून गळफास घेण्याची तसेच तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्याशी अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी धीरज हणमंत कांबळे यास अटक करण्यात आली असून त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.