सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील भिलकटी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली. काटून एमएसटी एंजेला असे पासपोर्टवर त्या महिलेचे नाव असून, तिच्याकडे विविध नावांची वेगवेगळी कागदपत्रे मिळाली. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जिल्हा विशेष शाखेकडून फलटण तालुक्यात व्हिसाची मुदत ८ जुलै २४ संपल्यानंतरही एक विदेशी महिला वास्तव करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर फलटण पोलिस भिलकटी येथे चौकशीसाठी गेले. त्यांना तेथे काटून एमएसटी एंजेला नावाची बांगलादेशी महिला हाजीर राजा साहब शेख (रा. निकमवस्ती, भिलकटी, ता. फलटण) या व्यक्तीसोबत राहत असल्याचे आढळून आले. त्या महिलेकडे कागदपत्रांची तपासणी करून अधिक माहिती घेतली असता तिच्याकडे सलमा काटून असे तेलंगणा राज्याचे आधार कार्ड आढळून आले.
तिच्याकडे सलमा हाजीर शेख या नावाचे महाराष्ट्र राज्याचेही आधार कार्ड आढळून आले. त्याचबरोबर कुरेश मज्जिद फलटण (कुरेशनगर, ता. फलटण) यांच्याकडील निकाह प्रमाणपत्र आढळले. त्यावर ”दुल्हे का नाम हाजीर राजा साहब शेख (रा. निकम वस्ती, भिलकटी, ता. फलटण), तसेच दुल्हन का नाम सलमा हाजी मोहम्मद सरदार (रा. सोलापूर)” असे आढळून आले.
बांगलादेशाच्या पासपोर्टच्या झेरॉक्स प्रतीवर काटून एमएसटी एंजेला असे या महिलेचे नाव आढळले. ९ जुलै २०१९ ला काढलेल्या पासपोर्टची मुदत ८ जून २०२४ ला संपली आहे. या महिलेकडे बांगलादेशचे मतदान कार्डची कलर झेरॉक्स प्रतही सापडली आहे. तिच्याकडे सापडलेल्या पासपोर्ट, महाराष्ट्र राज्य आधार कार्ड व तेलंगणा राज्य आधार कार्ड यावर असलेल्या जन्म तारखेमध्ये विसंगती आढळून आली.
मुदत संपूनही व्हिसाचे नूतनीकरण न करता बेकायदेशीर व बिगरपरवानगीने भिलकटी येथे संबंधित महिलेचे वास्तव्य असल्याचे आढळले. त्या महिलेकडे भिलकटी (ता. फलटण) येथील मतदान कार्डही आढळून आले आहे. संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.