पालकमंत्री देसाईंच्या मतदार संघातील ‘या’ गावातील ग्रामस्थ बार बंदीसाठी आक्रमक; थेट आंदोलनाचा दिलाय इशारा

0
538
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघ हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा असून त्यांच्या मतदार संघात सध्या वाढलेल्या बारची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मतदार संघातील श्री क्षेत्र खंडुआई मंदिर परिसरातील बार बंद करण्यात यावा, यासाठी म्हावशी, गुजरवाडीतील ग्रामस्थांनी पोलिसात निवेदन दिले असून तातडीने बार बंद न केल्यास थेट आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सडादाढोली पठारावरील म्हावशी, गुजरवाडी गावचे जागृत ग्रामदैवत श्री खंडुआई देवीचे मंदिर आहे. दाढोली ग्रामपंचायत हद्दीत मंदिराजवळच एकाने बार व हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. आठ महिन्यांपासून म्हावशी, गुजरवाडी ग्रामस्थांनी पाटण पोलिस व तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली. मात्र, त्यावर काहीही प्रतिबंध झाला नाही. चार दिवसांपूर्वी हे हॉटेल, बार सुरू झाला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट पोलिस ठाणे गाठले.

दाढोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे सुरू केले आहे. याबाबत प्रांत, तहसीलदार, पाटण पोलिस ठाणे व उत्पादन शुल्क यांना याबाबत लेखी निवेदन दिले असतानाही संबंधित विभाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बार मालकाने चार दिवसांपूर्वी येथील हॉटेल सुरू केले आहे. याबाबत स्थानिकांतून तीव्र संतापाची लाट आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखवत असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा, मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून आठवडाभरात तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत येत्या आठवड्याभरात वरिष्ठांकडे अहवाल देणार असल्याचे आश्वासन दिले.