सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बोडके येथे किरकोळ कारणावरून युवकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीच या गुन्ह्यातील सहा संशयितांना अटक करण्यात आली असून, दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दिनांक ३) बोडके येथे घोडा नाचविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात अनिकेत शिवाजी जाधव, प्रवीण शहाजी जाधव, शशिकांत सुरेश जाधव, सागर धोंडीराम जाधव, किरण सुरेश जाधव यांना लोखंडी रॉड, काठी व फायटर याने मारहाण करून जखमी केले होते, तसेच अनिकेत याला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड डोक्यात मारला होता. या गुन्ह्यातील सहा संशयितांना गुन्हा दाखल होताच तत्काळ अटक करण्यात आली होती, तसेच दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलेले होते.
गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी व खटाव परिसरात दहशत असलेल्या के. एम. कंपनी खटाव या गॅंगचा टोळी प्रमुख करण बचाराम मदने (वय २२, रा. खटाव) हा पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना करण मदने हा सांगली जिल्ह्यातील करगणी, आटपाडी परिसरात रात्रीच्यावेळी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी गणेश खाडे, अजिनाथ नरबट यांना सोबत घेऊन वेशांतर करून करण याला ताब्यात घेतले, तर दुसरा पाहिजे असलेला संशयित यश विजय जाधव (रा. वडूज) याला वडूजमधून ताब्यात घेतले. करण मदने याच्या विरुद्ध पुसेगाव पोलिस ठाण्यात तसेच पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.