सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथील डोंगरात बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या सोमवारी (दि. 16) रोजी रात्री सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. त्यामुळे फडतरवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फडतरवाडी येथील ढगा नावाच्या शिवारात दि. 7 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास वस्तीतील शेतकर्यांना बिबट्या दिसल्याची चर्चा होती. या शिवारात राहणार्या अनिल जाधव यांचे पुतणे सुजल व महेश हे सोमवारी (दि. 16 जून) रात्री 10 च्या सुमारास वाठार स्टेशन येथून कारमधून येत असताना, त्यांच्या घराच्या गेटसमोर बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने, बिबट्या शेजारच्या शेडवरून एका कुत्र्याला घेऊन पसार झाला.
त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये हा बिबट्या कैद झाला आहे. वन विभागाच्या वाठार स्टेशन अधिकार्यांनी तेथे भेट देऊन, रात्रगस्त करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.
ग्रामस्थानी पाळाव्यात या सूचना
शेतात समूहाने जावे. सोबत घुंगराची काठी व टॉर्च घ्यावी. मोबाइलवर मोठ्याने गाणी वाजवल्यास, वन्यप्राण्यांना चाहुल लागून, ते मार्ग बदलतील. शेतात उसाची व पिकांची लागवड अगदी घरालगत करू नये. लागवड क्षेत्र व घर यांच्यामध्ये 25-30 फुटांचा पट्टा ठेवावा. तो नेहमी स्वच्छ ठेवावा. शेतीची अनेक कामे खाली बसून करावी लागत असल्याने, शेतमजुरांनी काळजी घ्यावी. वन्यप्राणी दिसल्यास वन विभागाला त्वरित कळवावे. उन्हाळ्यात उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये. अंगणाला जाळीचे कुंपण असावे. घराभोवती वाढलेले गवत काढून, परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजूबाजूला दिवे लावावेत. उघड्यावर शौचास जाऊ नये. पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात ठेवावे. लहान मुलांना अंगणात किंवा बाहेर एकटे सोडू नये. लहान मुलांनी शाळेत समूहान ये-जा करावी, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.