सातारा प्रतिनिधी | दुचाकी वाहनाला झालेल्या अपघाताच्या व नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून चारचाकी वाहन चालकास मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील बनपुरी येथे घडली.
संजय पांडुरंग कर्चे (वय ५५, रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली संजय कर्चे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, कर्चे यांचे चारचाकी वाहन (एमएच ४५, एएफ ३५७१) असून, ते स्वत: वाहन चालवून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. रविवारी (ता. १५) कर्चे हे चारचाकी वाहनात कांदे भरून नातेपुते ते सांगली प्रवास करीत होते. त्यावेळी सोनाली हिने कर्चे यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. नंतर एका अनोळखीने फोन घेऊन तुमच्या वडिलांनी बनपुरी येथे दोन दुचाकीस्वारांना धडक दिली असून, दुचाकीस्वारांचा पाय मोडला आहे. त्यांना सातारा येथे दाखल केले आहे. आम्ही तुमच्या वडिलांना मारहाण केली नाही, तसेच तुम्ही अपघातग्रस्त वाहनांचे व जखमींच्या औषधोपचाराचे पैसे दिल्यास आम्ही पोलिसांत तक्रार करणार नसल्याचे सांगितले. याबाबत सोनाली हिने बहीण वर्षा दत्तात्रय सोडमिसे हिला झालेली घटना सांगितली.
त्यानंतर मामा रावसाहेब रामचंद्र खांडेकर (रा. लोणार खडकी, ता. माण) यांना सांगून त्यांना कातरखटाव येथे जाण्यास सांगितले. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता श्री. खांडेकर, बजीरंग काळेल, शिवाजी क्षीरसागर हे कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर संजय कर्चे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी सोनाली हिने वडिलांना फोनवरून अपघात कसा झाला, याबाबत माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्चे हे कातरखटाव ते मायणी रस्त्याने जाताना बनपुरी येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे चारचाकी वाहन अन्य दुचाकीला घासून किरकोळ अपघात झाला होता.
त्यावेळी दुचाकीवरील अज्ञातांनी कर्चे यांचा पाठलाग करून त्यांना थांबवून अन्य लोकांना बोलावून त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी, तसेच रॉडने मारहाण केली. त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रुपये काढून घेतले, तसेच त्यांना झालेल्या बेदम मारहाणीत पाय, बरगडी मोडल्याचे व तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावर, पाठीवर, छातीवर बेदम मारहाण झाल्याचे व्रण दिसून आल्याचे खांडेकर यांनी सांगितले.
त्यानंतर खांडेकर यांनी संजय कर्चे यांना खडकी येथे घेऊन गेले. सोमवार, दि. १६ रोजी सकाळी त्रास होऊ लागल्याने कर्चे यांना म्हसवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी म्हसवड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले असता संजय कर्चे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत.