‘चारचाकी’च्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; पाटणच्या दाढोली – गुजरवाडी घाटात अपघात

0
120
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दाढोली- गुजरवाडी घाटातील पहिल्याच वळणावर झालेल्या चारचाकी व दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार झाला. राहुल संजय पवार (वय ४३, रा. साईदर्शन कॉलनी, सैदापूर, ता. सातारा) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहुल पवार दुचाकीवरून (एमएच ११ सीएल ९३६०) गुजरवाडी घाटातून पाटणकडे निघाले होते. त्या वेळी समोरून अंकुश लक्ष्मण झोरे (वय २८, रा. फुरसाई धारेश्वर दिवशी, ता. पाटण) हे चारचाकी (एमएच १४ एल ८७२७) घेऊन पाटणवरून तारळेकडे जात होते. त्या वेळी खंडुआई मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वळणावर चारचाकी व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत राहुल पवार यांच्या डोक्याला जबरी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पाटण, चाफळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चाफळ दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार आर. सी. वेताळ व कॉन्स्टेबल एस. जी. शेडगे यांनी अपघाताची पाहणी केली. त्यानंतर मृत राहुल पवार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाटण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.