अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील 45 गावांना दरडींचा धोका

0
105
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली असून, भूस्खलन आणि दरडप्रवण भागात प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील 45 गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. यासोबतच सातारा, वाई तालुक्यांतही ज्या काही गावांना धोका आहे, अशा गावांवर महसूल प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे.

यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुरुवात केली आहे. सध्या पश्चिमेकडील तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, वाई, सातारा, कर्‍हाड तालुक्यांना पावसाळ्यात संभाव्य दरड कोसळणे, भूस्खलनाचा धोका आदी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये पाटण तालुक्यातील 22 ते 24 गावे आणिमहाबळेश्वर तालुक्यातील दहा ते 15 गावे दरडप्रवण असून, तेथे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अतिपावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असल्याने या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे व तसेच शासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवार्‍याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे तात्पुरते स्थलांतर होणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी व तहसीलदारांना महसूल प्रशासनाने सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबत वाई, जावळी, सातारा व कर्‍हाड तालुक्यातील काही गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

जेथे दरडप्रवण भाग आहे, तेथील गावात ग्रामसेवक व मंडलाधिकार्‍यांना तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास
ताम्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.सातारा, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील काही घाट रस्त्यावरही दरड कोसळण्याची भीती आहे. या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातूनलक्ष ठेवणे आवश्यक आहे, तसेच भूस्खलन होणार्‍या भागावर ही विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.