पाटण प्रतिनिधी | गेली ११ वर्षे विरोधकांकडून होणारी अडवणूक, कार्यकर्त्यांची पिळवणूक, जबरदस्तीने झालेले पक्षप्रवेश आणि दबावाचे राजकारण या सर्व प्रकारचा त्रास सहन करण्याची मर्यादा संपली आहे. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा ठाम निर्णय पाटणकर गटाने सोमवारी आयोजित बैठकीत एकमुखी घेतला.
पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी डोंगर कपारीतील गावागावांतून युवकांबरोबर ज्येष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन सर्वांना विश्वासात घेत योग्य तो निर्णय भाजपच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीशी चर्चा करून लवकरच घेण्यात येईल, असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. पाटण येथील श्रीराम मंदिरात पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकीय ध्येयधोरण ठरविण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मंथन बैठक आयोजित केली होती. त्यात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांची मते ऐकल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ”आपण गेली ४० वर्षे सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन सकारात्मक विचारांचे राजकारण केले. मात्र, आताची परिस्थिती पाहता नवीन संकल्पना व नवीन विचारांच्या सोबत आपल्याला जावे लागणार आहे. सर्व संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय करून, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. तो आपल्यालाही सांगितला जाईल.” निश्चितपणे जिथे जाऊ तेथील लोकांच्या खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी प्रयत्न करून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सत्ता प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ढेबेवाडी विभागातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंदूराव पाटील, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, याज्ञसेन पाटणकर यांच्यासह पाटणकर गटाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सचिन जाधव, योगेश पाटणकर, शंकर पाटील, लहुराज कदम, माजी सरपंच नारायण डिगे, हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार, राजेश पवार, रमेश मोरे, सुभाष पवार, नथुराम मोरे, शंकर शेडगे, अभिजित कडव, विजयकुमार कदम, शशिकांत पाटील, चेतन कणसे, चंद्रकांत शिर्के, साहेबराव गायकवाड, बाळासाहेब माने, सर्जेराव मोहिते, ॲड. दीपक पाटील, बबन कांबळे, संजय इंगवले आदी कार्यकर्त्यांनी त्यांना गेल्या ११ वर्षांत आलेले कटू अनुभव व्यक्त करत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत भावना व्यक्त केल्या.