पाटण प्रतिनिधी । कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 च्या निमित्ताने, “मिशन तेजस्विनी” अंतर्गत जीविका फाउंडेशन आणि सातारा जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन, साताऱ्यातील सरकारी शाळेतील मुलींचे गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी मिशन तेजस्विनी ही फक्त आरोग्य योजना नाही, तर ही आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठीची एक चळवळ आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कोयना दौलत डोंगरी महोत्सव हा स्थानिक संस्कृती, शेती आणि ग्रामीण पर्यटनाचा उत्सव आहे. या महोत्सवात आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम करण्यात आला. अलीकडच्या काळात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्याच्या दृष्टीने हे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीच्या मुलींना त्यांच्या पालकांची संमती घेऊन, आरोग्याची सुरक्षितता आणि नियमांचे पालन करत लसीकरण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, मिशन तेजस्विनी ही फक्त आरोग्य योजना नाही, तर ही आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठीची एक चळवळ आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा टाळता येण्याजोगा असूनही महिलांसाठी जीवघेणा ठरतो. अशा लसीकरण मोहिमांमुळे आपण दुर्लक्ष व विषमता यांचे दुष्टचक्र तोडत आहोत. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायांतील मुलींपर्यंत पोहोचून, आपण त्यांच्या आरोग्यातच नव्हे, तर त्यांच्यात सामर्थ्य आणि सन्मानपूर्वक जीवनाची क्षमता निर्माण करत आहोत. हा उपक्रम आरोग्य, शिक्षण आणि प्रशासन यांचा उत्तम संगम आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, ग्रामीण विकासाची जबाबदारी आमच्यावर असल्याने, आम्हाला थेट अनुभव आहे की, ग्रामीण भागांमध्ये सुलभ प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची किती गरज आहे. या लसीकरण उपक्रमामुळे साताऱ्यातील किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषमतेचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. कोयना दौलत महोत्सवाच्या मंचाचा वापर करून आम्ही ही सेवा समुदायाच्या दारात आणली. हा उपक्रम हे सांगतो की, प्रत्येक मुलीला — तिच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता — आरोग्यपूर्ण आयुष्याची संधी मिळाली पाहिजे.
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जीविका फौंडेशनचे जिग्नेश पटेल म्हणाले, या जीवनरक्षक उपक्रमात सहभागी होणे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. ही लसीकरण मोहीम म्हणजे संस्थांनी आणि समुदायांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या शाश्वत सार्वजनिक आरोग्य परिणामांचे उदाहरण आहे. या मिशन तेजस्विनी अंतर्गत झालेल्या सहकार्यामुळे ग्रामीण भारतात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे महत्त्व अधोरेखित होते. अशा उपक्रमांमुळे केवळ जीव वाचत नाहीत, तर आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि माहितीपूर्ण पिढी तयार होते. या यशस्वी उपक्रमाचा इतर जिल्ह्यांमध्ये अनुकरण करता येईल, ज्यामुळे महाराष्ट्रात किशोरवयीन मुलींच्या आरोग्य आणि सशक्तीकरणासाठीचा प्रयत्न अधिक मजबूत होईल.