कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत एक ते पन्नास मतदान केंद्रांची मतमोजणी दुपारी दोनच्या सुमारास पूर्ण झाली. त्यात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल सुमारे 4 हजार मतांनी आघाडीवर राहिले. अशीच आघाडी कायम राखत 21/0 असा विजय मिळवून दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी भेदला ‘सह्याद्री’चा चक्रव्यूह. विरोधी दोन्ही पॅनेलला 8 हजारहून अधिकच्या मताधिक्याने पराभवास सामोरे जावे लागले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने 21/0 असा मोठा विजय मिळवला. या विजयामुळे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
21 जागेसाठी तिन्ही पॅनेलचे 61 उमेदवार व अपक्ष 9 असे 70 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामुळे सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. आमदार मनोज घोरपडे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. 4 ते 5 हजाराच्या मतांनी पॅनेल निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी जाहीर सभांमधून व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात सभासद मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. सभासद बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
सह्याद्री कारखान्याचे कराड, सातारा, कोरेगाव, खटाव व कडेगाव अशा पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र असून 32205 सभासद कारखान्याचे मतदार आहेत. यापैकी 26081 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सहा गट व चार आरक्षित प्रवर्गातून एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी 99 मतदान केंद्रांवर मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. मतमोजणी कराड येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये रविवारी सकाळी 8 वाजता सुरू झाली. दोन फेर्यांमध्ये मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या फेरीत 1 ते 50 केंद्रांवरील मतांची मोजणी करण्यात आली, तर दुसर्या फेरीत 51 ते 99 मतदान केंद्रांवरील मते मोजण्यात आली. पहिल्या फेरीचा निकाल दुपारी दोनच्या दरम्यान जाहीर करण्यात आला.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी माजी सहकार मंत्री तथा विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या तीन पॅनेलमध्ये थेट लढत झाली होती.
सह्याद्री कारखान्याची निवडणूक तब्बल 25 वर्षांनंतर होत आहे. त्यात बाळासाहेब पाटील यांच्यापुढे विरोधकांनी मोठी चुरस निर्माण केली होती. सह्याद्री कारखान्यासाठी शनिवारी सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, कडेगाव या तालुक्यातील 99 केंद्रावर 81.7 टक्के मतदान झाले होते. कारखान्याच्या 32 हजार 205 सभासदांपैकी 26 हजार 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.