सातारा प्रतिनिधी | भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात लवकरच कायदेशीर चौकशी केली जाईल, तसेच या प्रकरणात निवृत्त अधिकारी प्रभाकर देशमुख हे असल्याचे विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यानंतर आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील आणि खटाव येथील घरी आज सातारा पोलिसांनी जाऊन देशमुख यांची तब्बल 3 तासाहून अधिक काळ चौकशी केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या महिलेला पोलिसांनी रक्कम स्विकारताना पकडून अटक केली. तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात काही महत्वाची माहिती देत चौकशी करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर आज पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस दाखल झाले. पत्रकार खरात व महिला व मंत्री गोरे यांच्या या प्रकरणा संदर्भात सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्यामुळे देशमुख यांची चौकशी सातारा पोलिसांकडून करण्यात आली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या घरून शेवटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले.