पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम कोळणे गावात मोबाईल नेटवर्कसाठी शोध घेऊन चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये गेलेल्या ८० वर्षीय अर्जुन मानू डांगरे यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या असून सध्या कराडच्या कृष्णा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कोळणे गावात मोबाइलची रेंज मिळवण्यासाठी अर्जुन डांगरे जंगलात गेले होते. मोबाईलचे नेटवर्क शोधत शोधत ते चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये पोहोचले. या ठिकाणी पोहचताच त्यांना कोअर झेनमधील अस्वलांनी पाहिले. काही कळणार इतक्यात त्यांच्यावर अस्वलाने झडप घालत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यामुळे ओरडलेल्या डांगरे यांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांचा आवाज परिसरातील ग्रामस्थांनी एकला. त्यावेळी तत्काळ धाव घेत ग्रामस्थांच्या आरडाओरडीनंतर अस्वल तेथून पळून गेले.
ग्रामस्थांनी लगेच वनविभागाला तसेच प्रशासनाला यांची माहिती दिली. व डांगरे यांना हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, डांगरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या हलचालींमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.