पाटण प्रतिनिधी । राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत शेती विभागातील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. चार अग्निशमन बंबांच्या साह्यानं ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळं लागली, हे मात्र समजू शकलेले नाही.
मरळी दौलतनगरमध्ये असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धूर पाहून आजुबाजूच्या गावातील लोकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. सुमारे अडीच ते तीन तास आगीचं रौद्ररूप पाहायला मिळालं. गळीत हंगाम बंद असल्यानं कारखान्यात फारसे कर्मचारी नव्हते.
अग्निशमन बंबांनी विझवली आग
आगीची घटना समोर आल्यानंतर कराड नगरपालिका, कृष्णा हॉस्पिटल आणि जयवंत शुगर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. त्याच बरोबर देसाई कारखान्याचा अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाला. एकूण चार बंबांच्या साह्यानं आग विझविण्यात आली.
शेती विभागाला बसली आगीची झळ
कारखान्याच्या स्थापनेपासून कारखाना स्थळावर एका बाजूला शेती विभाग कार्यरत आहे. त्या विभागालाच आग लागली होती. आगीत शेती विभागाशी संबंधित कागदपत्रे जळाली. कागदपत्रांमुळं आग भडकली. या आगीची शेती विभागाला मोठी झळ बसली आहे. मात्र, आगीच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.