सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. सातारा शहरात सोनसाखळी हिसकावणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, एका शिक्षिकेला पाठीमागून येऊन ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील तब्बल ४ लाख २२ हजारांची चेन हिसकावलयाची घटना दि. १७ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास राजवाड्यावरील राजधानी टॉवरजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे ता. सातारा येथील राहणाऱ्या शिक्षिका आशादेवी अजित साळुंखे (वय ४८) या सोमवार, दि. १७ रोजी दुपारी राजवाड्यावरील राजधानी टॉवर्सजवळून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून एक अनोळखी तरुण आला. त्याने तोंडाला काळा रुमाल बांधला होता. अचानक त्याने साळुंखे यांना ढकलून दिले. त्यानंतर चोरट्याने काही क्षणात त्यांच्या गळ्यातील ४ लाख २२ हजार रुपयांची ६५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली.
या प्रकारानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटा तेथून पळून गेला. भर वर्दळीच्या ठिकाणी एका शिक्षिकेला -अशाप्रकारे ढकलून त्यांची चेन चोरून नेल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिथे ही घटना घडली. त्या ठिकाणी पंचपाळी मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनासाठी महिला येत असतात. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.