कराड प्रतिनिधी । कराड येथील कोयना नदीवरील जुन्या लोखंडी पुलावरून एका वृद्धाने नदीत उडी घेतल्याची घटना सोमवारी घडली होती. परंतु, त्या व्यक्तीचा तोल जाऊन ते नदीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद वसीम बालेखान नदाफ (रा. वारुंजी फाटा, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. नजीर करीम पठाण (वय ७८, रा. कऱ्हड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार (दि. १७) रोजी सायंकाळी जुन्या लोखंडी कोयना पुलावरून एका वृद्धाने नदीत उडी मारल्याची घटना घडली होती. परंतु, याप्रकरणी वसीम नदाफ यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मित्र जुबेर नजीर पठाण हा त्यांच्या कुटुंबासह सह्याद्री हॉस्पिटलसमोर राहण्यास आहे. त्याचे वडील नजीर पठाण यांना देवधर्माची आवड असल्याने ते वारंवार माशांना खायला घालत होते.
सोमवारी सायंकाळी फिर्यादी वसीम नदाफ हे कोयना पुलावरून घरी जात अंसताना त्यांना पुलावर लोकांची गर्दी दिसली. यावेळी त्यांनी पाहिले असता मित्र जुबेर पठाण यांच्या वडिलांची दुचाकी तिथे उभी असल्याचे त्यांना दिसून आले. तेथील लोकांनी दुचाकीवरील व्यक्ती तोल जाऊन नदीत पडले असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी वसीम नदाफ यांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना व पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांचा शोध घेत असताना नदीत नजीर पठाण यांचा मृतदेह आढळून आला.