वनव्याने पेटलेली आंब्याची बाग विझविताना आगीने होरपळून शेतकर्‍याचा मृत्यू; पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडीतील घटना

0
1227
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । अज्ञाताकडून डोंगरास लावलेली आगीचा वनवा परिसरातील आंब्याच्या बागेत शिरल्याने तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या वयोवृद्ध शेतकर्‍याचा आगीने होरपळून मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली. तुकाराम सीताराम सावंत (वय 64, रा. अंब्रूळकरवाडी) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या वणव्यात सुमारे 100 ते 150 आंब्याची झाडे जाळून खाक झाली असून लाखो रुपयांचे देखील नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील जौंजाळवाडी या गावच्या हद्दीत चिरका नावाच्या शिवारातील डोंगरास शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. उन्हाळ्याच्या तडाख्याने आग भडकून तिने रौद्ररूप धारण केले होते. जोरदार वार्‍यामुळे ही आग अंब्रूळकरवाडीच्या शिवारात घुसली. ही अंब्रूळकरवाडीच्या हद्दीतील पठारावर असलेल्या पड्यालला पट्टा नावाच्या शिवारातील आंब्याच्या बागेला लागल्याचे तुकाराम सावंत समजताच त्यांनी बागेकडे धाव घेतली.

ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना आगीने बागेस पूर्णपणे वेढा घातल्याचे सावंत यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे अशोक सावंत व त्यांच्या पत्नी सुनंदा सावंत यांनी हाका मारुन तुकाराम यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचलाच नाही. परिणामी रौद्ररूप धारण केलेल्या आगीत आंब्याच्या झाडांसोबतच शेतकरी तुकाराम सावंत यांचा अक्षरशः होरपळून जागीच मृत्यू झाला. त्यांचा एक मुलगा असून तो राजस्थानमध्ये भारतीय सैन्य दलात आहे.

घटनेची माहिती समजताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण दाईंगडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरु होती. तुकाराम सावंत यांच्या मृत्यूमुळे अंब्रूळकरवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.