सातारा प्रतिनिधी । माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावरील चिरायू हॉस्पिटलकडून येणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. सरस्वती नंदू वायदंडे (वय ४५, रा. गुरुवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. त्या नगरपालिकेमध्ये कामाला होत्या. तसेच त्यांची नेमणूक हुतात्मा स्मारकामध्ये होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वायदंडे या कामावर जातात, तर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या परत येतात. बुधवारी दैनंदिन काम आटोपून त्या घरी निघाल्या होत्या. पावणेएक वाजण्याच्या सुमारास त्या माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावर तालुका पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर आल्या असता यावेळी चिरायू हॉस्पिटलच्या बाजूने येणाऱ्या एका कारने त्यांना आदर्श कॉर्नर बिल्डिंगजवळ जोराची धडक दिली. यामध्ये सरस्वती गंभीर जखमी झाल्या.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी पोचले होते. त्यांनी परिसरातील नागरिकांनी सरस्वती यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.