अजितदादांच्या कराड दौऱ्यात ‘बाळासाहेब’ सोबतच; प्रीतिसंगमावर एकत्रित केलं अभिवादन

0
2816
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी उपस्थित राहून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजितदादा कराला येणार असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान, समाधीस्थळी अजितदादांच्या गटासोबत खासदार शरद पवार गटातील नेते मंडळी देखील एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. खासदार शरद पवार यांच्या गटातील नेते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी उपस्थित राहत अजितदादांसोबत अभिवादन केले. या दरम्यान, बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

कराड येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदींनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी या मंडळींमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीने सर्वांचे मात्र, लक्ष वेधून घेतले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडला प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आल्यापासून ते जाईपर्यंत माजी आमदार बाळासाहेब पाटील ये त्यांच्यासोबत बाजूलाच उपस्थित राहिले. अगदी अभिवादन करताना देखील बाळासाहेब पाटील यांनी अजितदादांची पाठ काही सोडली नाही. तसेच माध्यमांशी संवाद साधताना देखील बाजूला उभे राहून आपली उपस्थित दाखवून दिली. आता शरद पवार गटाचे माजी आमदार आणि अगदी विश्वासू असणारे बाळासाहेब पाटील अजितदादांसोबत अभिवादनासाठी उपस्थित राहिल्याने ते अजितदादांच्या गटात जाणार का? अशी देखील चर्चा सध्या सुरु झाली आहेत.

कारखाना निवडणूक आणि साखरपेरणी

सध्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब पाटील हे देखील उभे आहेत. कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक जिंकायचीच अशी धारणा बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. त्या दृष्टीने त्यांच्याकडून कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्यागाठीभेटी घेत त्यांच्याशी चर्चा देखील केली जात आहे.

सकाळी अजितदादांसोबत अभिवादन तर संध्याकाळी सभासद शेतकऱ्यांशी संवाद

माजी सहकारमंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सकाळी जाऊन अभिवादन केले. जवळपास तासभर अजितदादांसोबात बाळासाहेब पाटलांनी प्रीतिसंगमावर उपस्थिती लावली. सकाळच्या भेटीगाठीनंतर आता संध्याकाळी अभयनगर आणि सुपनेयेथे कारखाना शेतकरी सभासदांचा सुसंवाद स्नेह मेळावा आयोजित करत या ठिकाणी त्यांच्याशी बाळासाहेब पाटील संवाद साधणार आहेत.

WhatsApp Image 2025 03 12 at 12.47.04 PM

अजितदादांच्या डावीकडे मकरंद आबा तर उजवीकडे बाळासाहेब

कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन कारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासोबत प्रशांत यादव देखील होते. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा अभिवादन करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याअगोदर बाळासाहेब पाटील समाधीस्थळी उपस्थित होते. याठिकाणी अजितदादांच्या डावीकडे मंत्री मकरंद आबा तर उजवीकडे उभे राहिलेल्या बाळासाहेब पाटलांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अजित पवारांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मला २५ वर्षे विधीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. या काळात काँग्रेस, एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार असतील या सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची माझी भूमिका राहिली आहे. राज्यातील सर्वच पक्षांशी, नेत्यांशी व्यक्तिशः माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. यशवंतरावांचा विचार सोडायचा नाही, ही आपली भूमिका आहे. आज आपल्याला काळ उलटा लागला असला तरी ‘कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे’, असं होत राहतं, असे देखील डिसेंबर महिन्यात सभासदांशी साधलेल्या एका मेळाव्यात माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी म्हंटले होते. त्यानंतर आता ते थेट अजित पवार यांच्यासोबत अभिवादन करण्यसाठी उपस्थित राहिले.