सातारा प्रतिनिधी | घरी जेवायला बोलावलेल्या दाम्पत्याने घरातूनच रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सातारा शहरात घडली आहे. या घटनेप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंमद ऊर्फ गुड्डू फिरासद अन्सारी व तमन्ना महंमद अन्सारी (मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मोळाचा ओढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत नम्रता युवराज अडसूळ (रा. शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, महंमद ऊर्फ गुड्डू फिरासद अन्सारी व तमन्ना महंमद अन्सारी दोघा दाम्पत्याला नम्रता युवराज अडसूळ यांनी घरी जेवायला बोलावले होते. दाम्पत्य घरात आल्यानंतर नम्रता अडसूळ या स्वयंपाक घरात काम करण्यासाठी गेल्या. त्याठिकाणी काम करत असताना दोघांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा २ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला, अशी फिर्यादी नम्रता अडसूळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. हवालदार देशमुख तपास करत आहेत.