कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत असलेल्या गणेश पेट्रोलपंपावर बुधवारी मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केला. तसेच त्याच्याकडील सुमारे सव्वालाखाची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे.
कोयत्याच्या प्राणघातक हल्ल्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाला असून परशुराम सिद्धार्थ दुकटे असे जखमीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाठार येथील गणेश पेट्रोल पंपावर काम करणारे परशुराम सिद्धार्थ दुकटे हे मंगळवारी रात्री कामावर आले होते.
मॅनेजर निलेशकुमार तावरे यांना मध्यरात्री घरी असताना त्यांच्या पंपाचे मालक ऋषिकेश गावडे यांचे काका शंकर गावडे यांनी फोन करून पंपावर काम करणारा कामगार परशुराम सिद्धार्थ दुपटे हा पंपावर पेट्रोल टाकणेचे काम करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी मुलांनी पेट्रोल टाकणेसाठी आल्यावर पेट्रोल टाकून मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या मुलाने मोटारसायकलवरून उतरून पेट्रोल टाकल्याचे पैसे दिले.
कामगार दुपटे हा पैसे बॅगमध्ये ठेवत असताना संबंधिताने कोयता काढून दुपटे याच्या दोन्ही हातावर व पाठीवर वार केले. त्याचदरम्यान त्याच्याजवळ असलेली पैशाची बॅग ते घेऊन पसार झाले. त्यात एक लाख २० हजार ९३५ रुपयांची रोकड चोरीस गेल्याची तक्रार निलेशकुमार तावरे यांनी दिली आहे.