सातारा प्रतिनिधी | सातारा सरत चोरीचा प्रकार घडला असून यातील आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शहरातील शाहूनगर येथे खरेदीच्या बहाण्याने किराणा दुकानातील महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून लंपास केल्याप्रकरणी एका बुरखाधारी महिलेसह दुचाकीवरील हेल्मेट घातलेल्या युवकांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माया दिलीप माने (रा. सागर रेसिडेन्सी, शाहूनगर, गोडोली) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे त्याच इमारतीत मंगलमूर्ती किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. काल दुपारी दोनच्या सुमारास माया दुकानात होत्या.
यावेळी एक बुरखाधारी महिला त्यांच्या दुकानात आली. तिने काही साहित्य खरेदी केले. त्यानंतर पैसे दिले. उरलेले पैसे देण्यासाठी माया या कॉऊनटरमध्ये सुटे पैसे शोधत होत्या. या वेळी त्या बुरखाधारी महिलेने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे गंठण हिसकावले. त्यानंतर ती महिला रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका दुचाकीवरून पसार झाली. याबाबत माया यांनी काल रात्री फिर्याद नोंदविली. हवालदार मोरे तपास करत आहेत.