अर्थसंकल्प सादर करताना मान्याचीवाडीचा उल्लेख; अर्थमंत्री अजितदादांकडून 8 गावांत सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची घोषणा

0
607
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) आज दुपारी विधानसभा अधिवेशनात सादर केला. उपमुख्यमंत्री अजितदादांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वीज दर कमी, औद्योगिक धोरण आणि रोजगार निर्मितीवर भर दिला. तसेच 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरु करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी व टेकवडी या गावांना “सौरग्राम” म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेद्वारे १०० टक्‍के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजितदादांनी केली.

अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी मागील वर्षी आगस्ट महिन्यात बैठक घेऊन ऊर्जा निर्मितीचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सर्वच वीज ग्राहकांनी ऑनग्रीड सौरऊर्जा निर्मीतीची शासकीय अधिकारी प्रक्रिया पूर्ण केली.

राज्यातील पहिले सौरग्राम करण्याच्या हालचाली मान्याचीवाडी येथे गतीमान झाल्या. त्यानंतर गावातील घरांच्या छपरांवर सौर ऊर्जा निर्मितीचे प्लेट्स बसवून तब्बल शंभर किलोवॕट वीज निर्मिती करण्यास सुरुवात देखील केली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम झाले तर दुसरे टेकवडी गाव होय. यानंतर आता आठ गावांमध्ये सौर ऊर्जेद्वारे १०० टक्‍के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे.

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा

पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून आतापर्यंत 1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर उर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे.

रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याना जोडण्यात येणार

राज्यातील 52 हजार 500 रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन इलेक्ट्रॉनिक वजनकाटयांना जोडण्यात येत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन – ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरुन स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे.

राज्यातील मान्याचीवाडीचा पहिलाच प्रकल्प राज्यातील इतर गावासाठी सौरऊर्जेत रोल मॉडेल : रवींद्र माने

ग्रामस्थांचे ऐक्य आणि शासनाच्या विविध अभियानांमध्ये असलेले सातत्य यामुळेच गावाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान आणि केंद्र शासनाच्या पी.एम.सुर्यघर योजना आणि ग्रामस्थांचे योगदान यामुळेच हा प्रकल्प छोट्याशा गावात यशस्वी झाला. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प पुर्णत्वास आला आहे. आज अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौरग्राम म्हणून मान्याचीवाडी व टेकवडी चा उल्लेख केला. राज्यासमोर अर्थ संकल्प सादर करताना गावाचे नाव मंत्री अजित दादांनी घेतल्याचे एकूण खूप समाधान वाटले. आमचे गाव नक्की सौर ऊर्जा निर्मितीत इतर गावासाठी रोल मॉडेल ठरले असल्याची प्रतिक्रिया मान्याचीवाडी गावचे सरपंच रवींद्र माने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.