कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र व चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कपाळाला लावणाऱ्या भस्मावर महादेवाचे ॲक्रालीक रंगाच्या माध्यमातून आकर्षक चित्र साकारले आहे.
पूजा करत असलेल्या साहित्यावर डाॅ.संदीप डाकवे यांनी साकारलेले हे चित्र लक्षवेधी आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. माता पार्वतीप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात.
भस्मावर चित्र साकारत डॉ.संदीप डाकवे यानी महादेवाचरणी आपली सेवा रुजू केली आहे. आज महाशिवरात्री निमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांकडून गर्दी केली जात आहे. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले आहे.