पाटण प्रतिनिधी | धामणी, ता. पाटण येथे १९७२ साली दुष्काळात बांधलेल्या पाझर तलावाखालील सुमारे ३०५ एकर शेतीला विजेशिवाय सायफन पाणी देण्यासाठी मागील अठरा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आता यश येण्याची आशा पल्लवित झाली असून, त्या कामाला पुन्हा गती मिळाली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या या प्रयत्नाला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास लवकरच विनावीज पाणी मिळणार आहे.
धामणी गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटरवर १९७२ च्या दुष्काळ कालावधीत पाझर तलाव बांधण्यात आला आहे. कृषी खात्याच्या काही अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कृषिभूषण सदाभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपूर्वी तलावाचा सर्व्हे झाला असता त्यातून विजेशिवाय शेतीला पाणी देणे शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सन २००७ मध्ये लोकसहभागातून खर्चाची तरतूद करून त्यासंदर्भात घेतलेली चाचणीही यशस्वी झाली.
मात्र, प्रत्यक्षात शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. ती गरज पूर्ण होऊ न शकल्याने पुढची कार्यवाही ढेपाळली. या ओढ्यावरील पाझर तलावाच्या वरच्या बाजूला आणखी काही बंधारे बांधलेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन तीनशेहून अधिक एकर जमिनीला आडव्या पाटाने सायफन पद्धतीने व ठिबकद्वारे, स्प्रिंकलर पद्धतीने पाणी देता येणे सहज शक्य आहे. वीज वापर टाळून शेतीला पाणी पुरवठा होणे शक्य असले तरी असे खर्चाचे अंदाजपत्रकही मोठे आहे.