सातारा प्रतिनिधी | कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झाला. यावेळी शिक्षण आणि जीवन व्यवहारांचा समन्वय असणे आवश्यक आहे. जगाच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा शिक्षणामध्ये अंतर्भाव असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे, याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि विद्यापीठांमध्ये दिले जाणारे शिक्षण जगाच्या बाजारात टिकणारे असले पाहिजे, या दृष्टीने शैक्षणिक धोरण विकसित केले.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव मस्के, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. हेमंत उमाप, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ”कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य पिढ्यानं पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्था त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा दाखला देते. त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित जनतेच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले, कर्मवीरांचा वारसा त्यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणासाठीच्या चिकाटीच्या बांधिलकीत आहे. शिक्षणाद्वारे वंचितांना सक्षम बनविणे, त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम करणे यावर त्यांचा विश्वास होता.”