कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान ऊसाचा रिकामा ट्रॅक्टर ओढ्यावरील पुलावरून पलटी होऊन अपघात झाल्याची व त्यामध्ये ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाल्याची घटना रेठरे खुर्द येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
संतोष दत्ता जाधव (वय २५, मूळगाव जालना जिल्ह्यातील असून, सध्या रा. कोकरूड तर्फ माळेवाडी, ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे. करंगुली (ता. शिराळा) येथील निनाईदेवी दालमिया शुगर्सवरून ऊस खाली करून रेठरे बुद्रुकला ऊस नेण्यासाठी येताना रेठरे बुद्रुक- वाठार मार्गावर हा अपघात झाला.
रेठरे बुद्रुक येथील शिवारातील तोडलेला ऊस काल सायंकाळी संतोष जाधव हे ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाहतूक करत करंगुली येथील निनाईदेवी दालमिया शुगर्सवर गेले होते. आज दुपारी करंगुलीकडून रेठरे बुद्रुककडे येताना रेठरे खुर्द येथे अपघात झाला. दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
रेठरे खुर्द व कमळाच्या झाडाच्या वळशाजवळ ओढ्यावरील पूल असून, तेथून उसाच्या बैलगाड्या कृष्णा कारखान्याकडे चालल्या होत्या. त्या वेळी जाधव चालवत असलेला ट्रॅक्टर मागे असताना बैलगाड्यांना ओव्हरटेक करून ते पुढे जाताना समोरून वाहन आल्याने चालक जाधव यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यात ट्रॅक्टर व दोन ट्रॉली पुलाचा कठडा तोडून ओढ्यात कोसळल्या. त्यात ट्रॅक्टरखाली सापडल्याने संतोष जाधव जागीच ठार झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ट्रॅक्टर मालक सत्यजित रावसाहेब सरनोबत (रा. इस्लामपूर) यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत अपघाताची नोंद केली आहे.