सातारा प्रतिनिधी | पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद-फलटण रस्त्यावरील निंभोरे येथील राजेंद्र बाबूराव अडसूळ शेतात काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या हा मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच फलटणचे वन क्षेत्रपाल सचिन रघतवान व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. वन विभागाच्या पथकाने मृत बिबट्याला ताब्यात घेतले.
फलटणचे पशुधन विकास अधिकारी यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले असता हा बिबट्या पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा असून, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत झाला असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील अधिक तपास फलटणचे वनक्षेत्रपाल रघतवान करत आहेत.