सातारा प्रतिनिधी | करंजे परिसरात शुक्रवारी सकाळी अल्पवयीन मुलांच्या दोन गटांत मारामारी झाली. यावेळी कोयत्याने वार झाल्याची माहिती समोर येत होती. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
करंजे येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अल्पवयीन मुलांमध्ये मारामारी झाली. यामध्ये – कोयत्यासह धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून, मुले जखमी झाल्याची माहिती करंजे परिसरात पसरली. हळूहळू याची चर्चा शहरातही सुरू झाली.
सोशल मीडियावर याबाबतची माहिती पडल्यावर पोलिसांनी घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली. जखमी मुलांना शोधण्यासाठी पोलिसांनी शहरातील दवाखानेही पालथे घातले; परंतु रात्री उशिरापर्यंत पोलिसांना जखमी मुले आढळून आली नाहीत, तसेच दोन्ही गटांतील कोणीही तक्रारीसाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले नव्हते. त्यामुळे गुन्ह्याची नोंदही झाली नव्हती. पोलिसांचा मात्र रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.