सांगलीतील चोरीस गेलेल्या दुचाकीसह संशयित चोरटा अडकला कराड शहर वाहतूक पोलिसांच्या सापळ्यात

0
779
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथून दुचाकीची चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. संबंधित चोरट्याने पोलीस चौकशी दरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याबाबत संशय आल्याने चोरटा पोलिसांना सापडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि २२ रोजी कराड एसटी बसस्थानकासमोर पोलीस उप निरीक्षक संतोष जगदाळे व ट्राफिक वॉर्डन ओंकार विलास शिंदे हे आपले कर्तव्य पार पाडीत होते. त्यावेळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विना नंबरप्लेट दुचाकी चालवित एकजण जात असल्याचा दिसला. यावेळी संबंधितास दुचाकी थांबवण्यास सांगितले. तसेच त्याच्या नावाची विचारणा करत पत्ता विचारता त्याने निरंजन सोमनाथ साळुंखे (वय २२, मुळ रा. म्हासाळ टेक, म्हसवड ता. माण जि. सातारा सध्या रा. c/o काटकर, खोडशी, ता. कराड जि. सातारा) असे सांगितले. तेव्हा त्याचे ताब्यातील दुचाकीची पोलिसांनी पाहणी केली असता. त्यांनादुचाकीच्या पुढील बाजुस व मागील बाजुस नंबरप्लेट नसल्याचे दिसून आले.

यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कागदपत्राची मागणी केली असता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात आणले. त्याठिकाणी दुचाकीचा चेसी नंबर व इंजिन नंबरवरुन आरटीओ कार्यालय कराड येथे माहिती मागविली असता. दुचाकीचा क्रमांक एम.एच.१०/ ए.आर./७५५२ असा असुन, दुचाकी मालकांचे नाव दुसरेच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दुचाकीच्या मूळ मालकांकडे चौकशी केली असता. सदर दुचाकी ही मे २०२४ मध्ये चोरीस गेलेली असुन, सदर दुचाकीबाबत भिलवडी पोलीस ठाणे जि. सांगली पोलीस ठाणे येथे फिर्याद देत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल असलयाची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाली.

यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वाहतुक नियंत्रण शाखेचे प्रभारी संदिप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक संतोष जगदाळे व ट्राफिक वॉर्डन ओंकार विलास शिंदे, ट्राफिक शाखेचे अंमलदार यांनी केलेली आहे