अंधारी खून प्रकरणी अरुण कापसेला पुन्हा अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

0
971
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यातील अंधारी येथे दिनांक २ जानेवारी रोजी संजय गणपत शेलार यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) कण्हेर धरणाशेजारी असणाऱ्या हॉटेल जलसागरचा मालक अरुण बाजीराव कापसे (वय ५५, रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) याला बुधवारी पुन्हा मिरजमधून ताब्यात घेतले. त्याला मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असताना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अंधारीत दोन जानेवारीला संजय शेलार यांचा मृतदेह आढळला होता. शेलार हे आपल्या कुटुंबासह वाई तालुक्यातील एका गावात इमारत बांधकामावर कामाला होते. ते गावाला जातो, असे सांगून गावी आले होते. गावात आल्यावर त्यांना काही लोकांनी पाहिलेही होते. मात्र, दोन जानेवारीला अचानक संजय यांचा मृतदेह गावच्या हद्दीतील एका शिवारात संशयास्पदरीत्या आढळला होता.

शेलार यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. तपासात ठोस काही मिळत नसल्याने हा तपास नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये अरुण कापसे याचे नाव होते. त्यामुळे १५ जानेवारीला एलसीबीने कापसे याला अटक केली होती;

परंतु न्यायालयात झालेल्या युक्तिवादामध्ये एलसीबीला अटकेचे ठोस कारण देता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने कापसे याची मुक्तता केली होती. त्यानंतर एलसीबीने अधिक सखोल तपासाला सुरुवात केली. यामध्ये कापसे याच्या विरोधात काही पुरावे उपलब्ध झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी ते पुरावे सादर करून न्यायालयाकडून कापसे याच्या अटकेची परवानगी मिळवली. त्यानंतर एलसीबीने कापसेचा पुन्हा शोध सुरू केला. त्यामध्ये तो मिरज येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार कापसेला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयात हजर केले असताना कापसेला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.