क्षेत्रमाहुलीत जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार प्रकरणी एकास अटक; रिव्हॉल्व्हरही केली जप्त

0
784
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथे नदीकाठी युवकांनी हवेत गोळीबार केल्याची घटना काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा पोलीसांनी अधिक तपास केली असता जमिनीच्या वादातून रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केल्याचे उघडकीस आले शिवाय गोळीबार झाल्यानंतर तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी गोळीबार करणार्‍यास अटक करून रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.

विजयसिंह सर्जेराव जाधव (वय 60, रा. क्षेत्रमाहुली ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी रविराज देशमुख (वय 28, रा. क्षेत्रमाहुली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविराज देशमुख व विजयसिंह जाधव यांच्यामध्ये गेले अनेक वर्षे जमिनीचा वाद धुमसत आहे. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रविराज देशमुख हे रानात काम करायला गेल्यानंतर तेथे विजयसिंह जाधव आले. जमिनीच्या वादातून दोघांमध्ये पुन्हा वादावादीला झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर विजयसिंह जाधव यांनी रिव्हॉल्व्हर काढत थेट हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसर हादरुन गेला व तणावाचे वातावरण निर्माण झाले.

क्षेत्रमाहुली येथे गोळीबार झाल्याचे समजल्यानंतर तेथे जमाव आला व त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. लाकडी दांडक्याने धोपटाधोपटी झाल्यानंतर पुन्हा तणाव निर्माण झाला. या हल्ल्यामध्ये महिलांचाही समावेश होता. अवघ्या 10 मिनिटांमध्ये गोळीबार व हाणामारी झाल्याची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत धरपकड केली. गोळीबाराची माहिती घेवून परिसर सील केला. संशयित विजयसिंह जाधव यांना अटक करुन रिव्हॉल्व्हर व हवेत फायर झालेली पुंगळी जप्त केली. गोळीबार व मारामारीच्या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट दिली. या सर्व घटनेने परिसरात व क्षेत्रमाहुली येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, भरदुपारी क्षेत्रमाहुली येथे गोळीबार होवून राडा सुरु असल्याची माहिती पोनि राजेंद्र मस्के यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे फौजदार सुधीर मोरे यांच्यासह पोलिसांसोबत धाव घेतली. पोलिस वेळीच स्पॉटवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.