बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत; नुकसान भरपाईत करण्यात आलीय वाढ

0
605
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव

कराड तालुक्यात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. शेकडो पाळीव जनावरांचा त्यांनी फडशा पाडला आहे. तर काही ग्रामस्थांवरही यापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पाळीव जनावरांची बिबट्याने शिकार केल्यास संबंधित शेतक-याला वन विभागाकडून भरपाई देण्यात येतेच. मात्र, आता बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

कराडच्या वनक्षेत्रालगत तसेच गावांच्या शिवारात बिनदिक्कतपणे बिबट्या वावरत आहेत. त्यांच्याकडून मानवी वस्तीसह इतर ठिकाणी बांधलेली पाळीव जनावरे फस्त केली जात असून तालुक्यात शेकडो जनावरे बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. ३ वर्षांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यूही झाला होता. जनावरांचा मृत्यू झाल्यास वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला भरपाईची रक्कम दिली जाते. त्याबरोबरच मनुष्याचा मृत्यू झाल्यास २५ लाख भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जनावरांवरील बिबट्याच्या हल्ल्याची २४९ प्रकरणे कराड वन कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये ५४ लाख ९२ हजार ९४० एवढी नुकसान भरपाई वन विभागाकडून देण्यात आली आहे.

जखमी बिबट्याचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला

उपचार करुन नैसर्गिक अधिवासात सोडलेल्या जखमी बिबट्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले. निवृत्ती चव्हाण असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बिबट्या सोमवारी वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. त्याला रेस्क्यू करण्यासाठी वन बिभागाचं पथक गेलं होतं. दरम्यान जखमी बिबट्याने साताऱ्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली असून नागरिक हादरले आहेत.

20 ऐवजी आता 25 लाख मिळणार

बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास पूर्वी २० लाख रुपये भरपाई कुटुंबाला दिली जात होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ करून भरपाई रक्कम २५ लाख रुपये करण्यात आली आहे.

या’ प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मिळते मदत

बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, माकड, नीलगाय, खोकड या प्राण्यांकडून मानवी हल्ला झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी

मदतीची रक्कम देताना १० लाख रुपये धनादेशाद्वारे इतर रक्कम मुदत ठेव स्वरूपात मृताच्या वारसाला दिली जाते.

7 महिन्यांत शेकडो जनावरांवर हल्ले

कराड तालुक्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात सुमारे साडेपाचशे जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे.

हल्ला झाल्यास 1926 वर करा कॉल

बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर १९२६ या वन विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो. त्यानंतर तातडीने मदत उपलब्ध होते.

डोंगरी भागात बिबट्याचे सर्वाधिक हल्ले

कराड तालुक्यातील ऑड, उंडाळे, तुळसण, आगाशिवनगर, डेळेवाडी, तांबवे, सुपने या परिसरात बिबट्याचे जास्त हल्ले होत आहेत. डोंगरी भागातही हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे.

जखमी, अपंगत्व आल्यास मदत मिळते का?

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यास औषधोपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, त्यासाठीही काही नियम असून प्रती व्यक्ती ५० हजार एवढी मर्यादा आहे.