सातारा प्रतिनिधी । जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील गावाकडे निघालेल्या महिलेला प्रवासादरम्यान तीन महिलांनी हातचालाखी करत तब्बल १३ लाख ४५ हजार रुपयांना लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. संबंधित महिलेला बसमध्ये बसलेल्या तीन महिलांनी ‘आमची चिल्लर नाणी तुमच्या सीटखाली पडली आहेत,’ असे सांगत महिलेच्या बॅगमधील रोख रक्कम व दागिने असलेल्या १३ लाख ४५ हजारांच्या ऐवजाची पिशवी चोरी केली आहे. या प्रकरणी महिलेने तिन्ही अनोळखी महिलांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे.
मालन विलास गायकवाड (वय ५६, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई; मूळगाव भोसलेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) असे पैसे चोरीस गेलेल्या महिलेचे नाव असून त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, त्या जमिनीच्या खरेदीखतासाठी मुंबई येथून सकाळी सात वाजता मुंबई- इस्लामपूर- कराड या बसने गावी भोसलेवाडी येथे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ७ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व सुमारे ६ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी त्यांच्या बॅगमध्ये ठेवली होती. ती बॅग सीटखाली ठेवली होती.
दरम्यान, बस वाकड (पुणे) येथे आली असता तीन महिला प्रवासी बसमध्ये बसल्या. त्यातील एका महिलेकडे लहान मुले होते. बस महामार्गावर नसरापूर (ता. भोर) येथून जात असताना एका महिलेने चिल्लर नाणी सिट खाली टाकत, ‘आमचे पैसे पडले आहेत,’ असे म्हणून ते उचलण्याचा बहाणा करत गायकवाड यांच्या बॅगमधील सोने व रक्कम असलेली पिशवी लांबवली. त्यानंतर बस वाहकाला, ‘आम्हाला येथेच उतरायचे आहे,’ असे सांगितले. मात्र, वाहकाने नकार दिला. त्यावर त्यांनी गोंधळ घालून कापूरव्होळ येथे उतरवण्यास भाग पाडले.
दरम्यान, मालन गायकवाड यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बॅगमधील पिशवी पाहिली असता ती चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी किकवी येथे उतरून त्यांच्या पतींना फोन केला व पतीला भेटण्यासाठी खंडाळ्याला जाऊन चोरीची घटना सांगितली. त्यानंतर त्या पुन्हा मुंबईकडे जाण्यास निघाल्या असता परत जाताना चांदणी चौक (पुणे) येथे बस थांबली. त्यावेळी चोरी करणाऱ्या तीन संशयित महिलांपैकी एक महिला त्यांना बसमध्ये चढताना दिसली. त्यांनी ओळखताच आरडाओरड केली ते पाहून संबंधित महिला पळून जाऊ लागली. मात्र, इतर प्रवाशांच्या मदतीने तिला पकडून बावधन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चोरीची घटना नसरापूर हद्दीत घडल्याने याबाबत राजगड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.
संशयित आरोपी महिला शैलजा राजू भोगे हिला बावधन पोलिसांनी राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चोरीमधील दागिने व रक्कम अद्याप हस्तगत झाली नाही. ऐवजाचा व या संशयित महिलेच्या इतर दोन साथीदार महिलांचा तपास राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अजित माने करत आहेत.