कराड प्रतिनिधी | कराड येथील माजी नगराध्यक्षांच्या घरात भर दुपारी कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. मार्केट यार्ड परिसरात माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे यांच्या घरात सोमवारी दुपारी चोरी झालेली घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. उदय हिंगमिरे यांनी याबाबत शहर पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मार्केट यार्डमध्ये उदय हिंगमिरे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी श्री. हिंगमिरे त्यांच्या ऑफिसला गेले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे याही नोकरीच्या ठिकाणी गेल्या. घराबाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास उमा हिंगमिरे घरी परतल्या. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उदय हिंगमिरे घरी आले. त्यानंतर रात्री जेवण करून झोपी गेले.
मंगळवारी सकाळी उमा हिंगमिरे यांना संक्रांतीनिमित्त परिधान करण्यासाठी दागिने हवे होते, त्यामुळे त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता, कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती पती उदय हिंगमिरे यांना दिली. दोघांनी कपाटात पाहिले असता, कपाटातील ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे मंगळसूत्र, १ लाख २० हजार रुपये किमतीचे २ तोळ्याचे नेकलेस आणि ६० हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाच्या बांगड्या चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.