सातारा प्रतिनिधी | पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत याची नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून (एमएच ०१ डीजे ८३६५) निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने (पीबी ०६ ए यु ९९९५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात रुबेल सिन्हा (वय २४) रस्त्यावर पडली, आणि तिच्या शरीरावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप, विलास यादव, पो. ह. अरविंद बाराळे, आणि भाऊसाहेब दिघे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुबेल सिन्हा हिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात गमावलेल्या जीवामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास केला व दुचाकीला धडक देऊन तरूणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी ट्रक चालक सोनू कुमार सिंग (रा. बेलापूर, नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
तसेच या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी वाहनचालकांना अधिक सावध राहण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.अपघातानंतर पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला व परिस्थिती नियंत्रणात आणली.