कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड- मलकापूर गावच्या हद्दीत पुढे चाललेल्या कारला पाठीमागून भरदार वेगात आलेल्या ट्रकने कारला जोरात धडक दिल्याची घटना आज सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकास दुखापत झाली नसून कारचा मात्र, अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील मलकापूर गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक (NL 01K 3728) ने एका कार क्रमांक (MH 12 NJ 7369) ला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती कि कार रस्त्याकडेला असलेल्या दगडी बॅरिगेटवर जाऊन आदळली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे अधिकारी दस्तगीर आगा, जगन्नाथ थोरात, संभाजी घुटुगडे, कराड शहर पोलीस ठाण्याचे अपघात विभागचे ए.एस. आय. चव्हाण सर्व कर्मचारी व मार्शल सुनील कदम, मोहन जगताप घटना स्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त कारला बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती. दरम्यान, या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.