सातारा जिल्ह्यातील 5 लाख 18 हजार लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार छाननी

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याचा निश्चितच निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा झाला; पण, आता मात्र ज्यांनी अर्ज भरले आहेत. निकष काटेकोरपणे तपासले जात असून, अनेक महिला या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, नुकतेच सातारा जिल्ह्यात सुमारे ५ लाख १८ हजार ४५१ महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत. यासाठी एकूण ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये आल्याने जिल्ह्यातील बहिणींमध्ये आनंदी वातावरण आहे. नव्या वर्षात आता जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या प्राप्त अर्जांची नव्याने छाननी करण्यात येणार असून या छाननीत आणखी किती अर्ज बाद होणार? या भीतीमुळे धाकधुक वाढली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात सुरू केली गेली. तेव्हा महिलांचे अर्ज भरून घेऊन त्यांना पात्रही ठरविण्यात आले. आचारसंहिता लागण्यापूर्वी या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मासिक रकमेचे हप्तेसुद्धा जमा करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी चांगल्याच सुखावल्या होत्या. आता मात्र या योजनेचे निकष बदलत भरलेल्या अर्जाची पडताळणी काटेकोरपणे सुरू केली आहे. या योजनेत निकष बदलले असल्यामुळे बहिणींचे अर्ज छाननीत उडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

8 लाख 21 हजार 970 अर्ज

सातारा जिल्ह्यात ८ लाख ३३ हजार २१३ महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८ लाख २१ हजार ९७० अर्ज स्वीकारले गेले. तर ४ हजार ४४४ अर्ज हे त्याचवेळी रद्द केले होते. आता या नव्या छाननीत आणखी किती अर्ज बाद होणार?, हे पाहावे लागणार आहे.

जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी

सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये