सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील नागठाणे येथून चोरीस गेलेल्या एका मोटारसायकलचा शोध घेऊन, बोरगाव पोलिसांनी दीपक उर्फ गोट्या तानाजी मोहिते (रा. नागठाणे) व संभाजी बबन जाधव (रा. अतीत, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे येथून एक मोटारसायकल चोरीस गेली होती. बोरगाव पोलीस ठाण्याचे डी. बी. पथक चोरट्यांच्या मागावर होते. दरम्यान, चोरीची मोटारसायकल घेऊन, दोन जण सातारहून अतीत येथे आल्याची आणि ते महामार्गाकडेला सेवा रस्त्यावर थांबल्याची माहिती सपोनि रवींद्र तेलतुंबडे व डी. बी. पथकाला मिळाली. डी. बी. पथक तात्काळ त्या ठिकाणी गेले असता, दोन जण दुचाकीवर बसलेले दिसले.
पोलिसांनी त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, ती मोटारसायकल चोरीची असल्याचे दोघांनी कबूल केले. सातारा व कोल्हापूर परिसरातून आणखी सहा मोटारसायकली चोरून, त्या अतीत येथे ठेवल्याचे सांगितले. त्या ठिकाणी पडताळणी करून पोलिसांनी सात मोटारसायकली जप्त केल्या. सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, अतुल कणसे यांनी ही कारवाई केली. हवालदार अमोल गवळी तपास करत आहेत.