सातारा प्रतिनिधी | थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे, वाहतुक विभाग शखेच्यावतीने सातारा परिसरात मंगळवारी सकाळपासूनच नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, थर्टी फस्ट साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्यप्राशन करुन वाहने चालवत असतात. मद्यधुंद स्थितीत अनेक ठिकाणी गोंधळ घातला जातो. या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे, वाहतूक शाखा अशी संयुक्त कारवाई ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत सातारा शहरातील बोगदा परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मोळाचा ओढा, वाढेफाटा तसेच अजिंक्यतारा किल्ला, चारभिंती परिसरात ही कारवाई सुरु होती.
सातारा शहर परिसरातही साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही गस्त घालत होते. नाकाबंदीवेळी पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच ब्रिथ नलायझर मशिनद्वारे मद्यपी चालकांचा शोध घेतला. यामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत चार जण मद्यधुंद स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.