कराड प्रतिनिधी | आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९० लाखांचा गंडा घालणाऱ्या एकास कराड शहर पोलिसांनी अटक केली.
श्रीकांत विलास पवार (वय ३६, सध्या रा. कोयना वसाहत, मूळ श्रीपूर, ता. माळशिरस, सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तोतया आयपीएस अधिकार्याने फसवणूक केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह संदीप कुंभार, अशोक वाडकर, महेश शिंदे यांच्यासह सहकार्यांनी मागील काही दिवसांपासून संशियतावर पाळत ठेवली होती.
त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक राम ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोयना वसाहत परिसरात बुधवारी सकाळी सापळा रचला.
सकाळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळी, हवालदार संदीप कुंभार, अशोक वाडकर यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्याने आपण तोतया अधिकारी असल्याचे सांगत १३ युवकांची तब्बल ९० लाखांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून आलिशान कार, त्याच्याकडील कागदपत्रे, लाल दिवा असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्याच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यासोबतच सांगली व सोलापूर जिल्ह्यांतही अनेकांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक माळी अधिक तपास करीत आहेत.